Wednesday, August 15, 2012

An Article Published in LOKSATTA - Mumbai Vrutant dt. 15th Aug. 2012


15 August 2012   गरिबाघरच्या गुणवंतांना विद्यादानाचे सहाय्य..!

स्वातंत्र्यदिनी चौथा वर्धापन दिन


खास प्रतिनिधी

प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर शालांत परीक्षेत ऐशी-नव्वद टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग निर्धोक व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेचा चौथा वर्धापन दिन बुधवार, १५ ऑगस्ट रोजी शहापूर येथे साजरा होत आहे. ‘लोकसत्ता’मधील एका बातमीवरून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या या संस्थेचा कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढत असून सध्या संस्थेकडे १३१ दाते आहेत आणि ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी यंदा शिक्षणासाठी मदत मागितली आहे.

येथील भाऊ नानिवडेकर, सत्यजीत आणि गीता शहा यांनी चार वर्षांपूर्वी सात देणगीदारांसह विद्यादान सहाय्यक मंडळाची मुहुर्तमेढ रोवली. पहिल्याच वर्षी आठ विद्यार्थ्यांना मंडळाने ५० हजार रुपयांची मदत दिली. आता वर्षांगणिक संस्थेकडे मदत मागणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि दात्यांची संख्या वाढत आहे.

सध्या शालांत परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना फारसा खर्च येत नाही. गरीब विद्यार्थीही प्रतिकूल परिस्थितीतही त्यावर मात करून चांगले गुण मिळवितात. मात्र उच्च शिक्षण घेताना पैसा अनिवार्य ठरतो. त्यामुळे गुणवत्ता असूनही गरीब विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. केवळ पैशाअभावी गुणवत्ता मागे पडू नये म्हणून विद्यादान सहाय्यक मंडळ प्रयत्न करते. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील हुशार मुलांना यथाशक्ती मदत करावी, अशी अनेक नागरिकांची इच्छा असते. विद्यादान सहाय्यक मंडळाने अशा दात्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वार्षिक २०० ते ५० हजार इतकी मदत देणारे अनेक दाते आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आवड आणि कल पाहून त्यांना पुढील शैक्षणिक वर्षांसाठी मदत मिळवून दिली जाते. संस्थेच्या सभासदांवर ठराविक विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवून त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. केवळ शैक्षणिक मदतच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही संस्था विविध उपक्रम राबविते. संस्थेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क- सत्यजीत शहा-९८२११५०८५८.

No comments:

Post a Comment