Monday, June 2, 2014

News article about Vidyadaan Sahayyak Mandal in Maharashtra Times

आकांक्षापुढती जिथे...
Jun 3, 2014, 02.05AM IST


भाग्यश्री भालके

शहापूरच्या पाड्यातील जमिनीच्या तुकड्यावर राबणारे वडील... घरातील सर्व सदस्य त्यांनाच मदतीचा हात देऊन उदरनिर्वाहासाठी झगडणारे. त्यातच घरात सर्वात मोठी असलेली भाग्यश्री बारावीच्या परीक्षेत चांगले गुण कमावण्याच्या जिद्दीनेच अभ्यास करत होती. घरातील पाणी भरण्यासाठी तासभराची रोजची पायपीट आणि १२-१२ तास असलेले लोडशेड‌‌िंग या अडथळ्यांना पार करत तिने सायन्समध्ये ७४ टक्के मिळवले. विज्ञानाची आवड असलेल्या भाग्यश्रीला नर्सिंग किंवा इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घ्यायचा आहे.

शहापूरमधील नडगावमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री भालके या मुलीने वाटेत असलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करत आपल्या शिक्षणाची घोडदौड सुरू ठेवली आहे. दहावीमध्ये ९२ टक्के मिळवलेल्या भाग्यश्रीने अभ्यास केला तो घरच्या सर्व जबाबदारी सांभाळतच. तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी असल्याने अभ्यासाबरोबरच घरच्या कामातही तिने हातभार लावला. प्रतिकूल परिस्थितीत तिने अभ्यासाची गतीही कायम राखली. ​तिच्या या प्रयत्नांना साथ लाभली ती ठाण्याच्या विद्यादान साहाय्यक मंडळाची.

साईराम माजगावकर

बोरीवलीच्या वझिरा नाक्यावरील आनंदराव पवार शाळेत शिकणाऱ्या साईराम माजगावकरची घरची परिस्थिती बेताची असली तरीही बहीण ज्या जिद्दीने शिक्षण घेतेय, ते पाहून त्यानेही जोमाने अभ्यास सुरू केला. आई घरकाम करून घरखर्चाला हातभार लावते तर वडील एका सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरीला. कुठलेही आर्थिक पाठबळ नसणाऱ्या साईरामला आधार दिला विद्यादान साहाय्यक मंडळाने. कॉमर्स शाखेत असणाऱ्या साईरामने १२वीच्या परीक्षेत ८६.७६ टक्के मिळवले आहेत. बोरिवलीत एका एसआरए बिल्डींगमध्ये राहणारा साईराम जात्याच हुशार. दहावीतही त्याने ९१.२७ टक्क्यांची कमाई केली होती. मोठी बहीणही हुशार असल्याने साहाय्यक मंडळाने िलाही आर्थिक पाठबळ दिले होते. तेच पाहून साईरामही अभ्यासाला लागला. डिसेंबर महिन्यात आईचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतरही विचलित होता त्याने आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि त्याचे फळ मिळाले ते ८६.७४ टक्क्यांत. बीएससी आयटी करत जपानी भाषा शिकण्याची त्याची इच्छा असून त्यासाठी हवी तेवढी मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे.

बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि वर्षभर अभ्यास करून चांगले यश संपादन केलेल्यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र आजारी शरीराशी झुंज देत चिकाटीने अभ्यास करून धवल यश संपादन केलेली हर्षी गुलाटी विशेष कौतुकाला पात्र ठरली आहे. डहाणूकर कॉलेजची कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी हर्षी गेली अनेक वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे तिला आठवड्यातून दोनदा डायलिसीससाठी जावे लागत असे. त्यामुळे ती नियमितपणे लेक्चरलाही बसू शकत नव्हती. मात्र या सगळ्यावर मात करून हर्षीने चिकाटीने अभ्यास केला आणि तिला बारावीत ७०.४७ टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात हर्षीला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे आणि त्याचसोबत फ्रेंच भाषेचे शास्त्रशुद्ध शिक्षणही घ्यायचे आहे. माझ्या यशात माझ्या आईबाबांबरोबरच शिक्षक आणि डॉक्टर यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढविला आणि मला खूपच मदत केली, असे ती सांगते.