लोकसत्ता
Leading International Marathi News Daily
25 September 2009
भावपूर्व वातावरणात साजरा झाला विद्यादान मंडळाचा वर्धापनदिन
शहापूर/वार्ताहर - शहापूर तालुक्यातील किन्हवली व टाकीपठार या आदिवासी दुर्गम भागातील गरीब प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा ज्ञानयज्ञ प्रज्वलित राहावा व त्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठावे, याकरिता त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी गेले वर्षभर धडपडणाऱ्या ठाणे विद्यादान सहाय्यक मंडळाचा प्रथम वर्धापनदिन सोहळा अतिशय भव्य वातावरणात व मोठय़ा उत्साहात साजरा झाला.
किन्हवली येथील शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयाच्या सभागृहात ठाणे विद्यादान सहाय्यक मंडळाचा वर्धापनदिन साजरा झाला. या कार्यक्रमास विद्यादान मंडळास मदत करणारे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर जनता विचार प्रसारक संस्थेचे कार्यवाह व व्हीजेटीआय कॉलेजचे प्रश्न. संजय मं.गो., प्रश्नचार्य कवी भगवान जाधव, विद्यादान सहाय्यक मंडळाचे संस्थापक भाऊ नानिवडेकर, पत्रकार सुभाष हरड आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून शहापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या २५ मुलांच्या कुटुंबियांमध्ये स्नेहभाव व ऋणानुबंधांच्या नि:स्पृह, निरलस गाठी बांधण्यासाठी ठाण्यातील विद्यादान मंडळाचे दानशूर सभासद आपल्या कुटुंबियांसमवेत खास लक्झरी बसने किन्हवलीत आले होते. यावेळी वर्षभरात विद्यादान सहाय्यक मंडळाच्या दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल त्यांच्या कृतज्ञभाव डोळ्यांतून व फुललेल्या चेहऱ्यातून स्पष्टपणे जाणवत होता.
सुरुवातीलाच आपली शैक्षणिक जबाबदारी घेणाऱ्या पालकांचे व पाहुण्यांचे स्वागत दत्तक मुलांनी रानफुले देऊन केल्याने कार्यक्रमाला नैसर्गिक स्वरूप आले होते व दातेही या स्वागताने भारावून गेले.
विद्यादान मंडळाचे शहापुरातील आधुनिक एकलव्य अंगठा कापून देणार नाहीत, तर प्रचलित व्यवस्थेला अंगठा दाखवून वठणीवर आणतील, अशी अपेक्षा संजय मं.गो. यांनी व्यक्त केली.
आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, ठाणे विद्यादान मंडळ आदिवासी भागात ईश्वरी कार्य करीत आहे. प्रतिकूल स्थितीत काम करणारी, शिक्षणाचे महत्त्व जाणणारी, नि:स्पृह सेवा करणारी माणसे अभावानेच दिसतात आणि अशी माणसे जेव्हा सर्वसामान्यांसाठी पुढे येतात, तेव्हा सर्वांनाच गहिवरून येते, असे उद्गार केळकर यांनी काढले. पत्रकार सुभाष हरड हे शहापूर तालुक्याचे समाजभूषण आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यादान मंडळाचे लाभार्थी विद्यार्थिनी माधुरी विशे व प्रकाश गायकवाड या दोघांना उत्कृष्ट वाचकाचा पुरस्कार देण्यात आला, तर दहावीला ९० टक्के गुण मिळविलेला गणेश शिर्के व ९१ टक्के मिळविलेला योगेश बुंदे या दोघांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष हरड यांचा सत्कार करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment