प्रतिकूलतेशी लढणाऱ्या प्रज्ञावंतांना मदतीचा हात!
ठाणे/प्रतिनिधी
येथील विद्यादान सहाय्यक मंडळाचा द्वितीय वर्धापनदिन नुकताच शहापूर येथील ग.प. खाडे विद्यालयात अत्यंत हृद्य वातावरणात पार पडला. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने शिकणाऱ्या प्रज्ञावंत मुलांना मदतीचा हात देण्याचे कार्य विद्यादान सहाय्यक मंडळ करीत आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक भाऊ नानिवडेकर यांनी सुरुवातीला गेल्या वर्षांच्या कार्याचा आढावा मोजक्या शब्दात सांगितला. त्यानंतर ते म्हणाले की, संस्थेचे चार विद्यार्थी समता विचार प्रसारक संस्थेच्या आय.पी.एच.मध्ये आयोजिलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभागी झाले, तर १४ मुले हेमलकसाच्या श्रमछावणीत सामील झाले. त्यामुळे हे विद्यार्थी बाहेरच्या जगात कसं वागावं हे तर शिकेलच, शिवाय त्यांना समाजकार्याचीही ओळख झाली.
या विद्यार्थ्यांपैकी गणेश शिर्के, राहुल भालके व चेतना लाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच संस्थेचा आश्रय मिळालेल्या मुलांच्या पालकांनीही आपली कृतज्ञता भिजल्या स्वरात कथन केली. यावेळी धारावीत राहून पीएचडी झालेल्या डॉ. शीतल शंकर डाफळे यांची संस्थेच्या कार्यकर्त्यां गीता शहा यांनी मुलाखत घेतली. डॉ. शीतल यांच्या प्रांजळ आत्मकथनाने सर्वाचीच मने हेलावली. या गप्पांमध्ये डॉ. शीतल यांचे आईवडील व लहान भाऊ हे कुटुंबीयही सहभागी झाले होते. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांसमवेत ठाणे परिसरातील मंडळाचे अनेक हितचिंतक व देणगीदार आवर्जून उपस्थित होते. तीन तास चाललेल्या हा हृद्य सोहळा सभागृहातील प्रत्येकाला अंतर्मुख करून गेला. याप्रसंगी गुणवान विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपर्क- भाऊ नानिवडेकर (९९२०३६७५७०)/सत्यजीत शहा (९८२११५०८५८).
Friday, September 10, 2010
Subscribe to:
Posts (Atom)